TATA Group : रतन टाटा यांचे ‘तरुण’ मित्र शंतनू नायडू यांची टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी

TATA Group : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे सहाय्यक म्हणून प्रसिद्ध झालेले शंतनू नायडू यांच्यावर टाटा मोटर्समध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नायडू हे टाटा सन्समध्ये सहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत आणि आता त्यांनी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर (स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज) म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारली आहे. ही त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतील एक मोठी वाढ मानली जात आहे.

शंतनू नायडू यांनी त्यांच्या लिंक्डन पोस्टमध्ये या बदलाची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबाचा टाटा समूहाशी असलेला जुना संबंधाचा उल्लेख केला. “मला आठवतं, माझे वडील टाटा मोटर्सच्या प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पँट घालून घरी परतत असत. त्यावेळी मी खिडकीजवळ त्यांची वाट पाहत असे. आता एक वर्तुळ पूर्ण झाले आहे,” असे नायडू यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे, आणि अनेकांनी शंतनू नायडू यांच्या नव्या भूमिकेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नायडू कुटुंबाची चौथी पिढी टाटा समूहाशी जोडलेली आहे. शंतनूचे वडील टाटा मोटर्सच्या पुणे प्लांटमध्ये काम करत होते, तर त्यांचे आजोबा आणि पणजोबा महाराष्ट्रातील भिरा येथील टाटा पॉवरच्या जलविद्युत सुविधेत काम करत होते. यावरून नायडू कुटुंबाचा टाटा समूहाशी किती घनिष्ठ संबंध आहे, हे दिसून येते. टाटा समूहाच्या विकासात नायडू कुटुंबाचाही मोलाचा वाटा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

शंतनू नायडू हे रतन टाटा यांचे तरुण मित्र म्हणूनही ओळखले जातात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर त्यांनी टाटा एलेक्सीमध्ये काम केले. टाटा एलेक्सीमध्ये काम करत असताना त्यांनी प्राण्यांना रस्ते अपघातांपासून वाचवण्यासाठी कुत्र्याच्या कॉलरचे डिझाइन तयार केले, ज्यामुळे रतन टाटा यांचे लक्ष वेधले गेले. रतन टाटा यांनी केवळ या प्रकल्पाला पाठिंबा दिला नाही, तर त्यांच्या कारकिर्दीला चालनाही दिली. त्यांनी शंतनू नायडू यांच्यातील क्षमता ओळखली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. शंतनू नायडू यांच्या शिक्षणासाठी टाटा ट्रस्टने देखील मदत केली. कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए करण्याचा खर्चही टाटा ट्रस्टनेच केला होता. यावरून रतन टाटा आणि शंतनू नायडू यांच्यातील खास मैत्री दिसून येते.

शंतनू नायडू यांची टाटा मोटर्समधील नवीन भूमिका त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना निश्चितच फायदा होईल. टाटा मोटर्समधील त्यांची कामगिरी त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीस दिशा देणारी ठरेल, यात शंका नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्स नवनवीन उंची गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment