NASA Discovered Asteroid : पृथ्वीच्या दिशेने लघुग्रहाची वाटचाल; शास्त्रज्ञांच्या नजरा रोखल्या

NASA Discovered Asteroid: खगोलशास्त्रज्ञांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय असलेला लघुग्रह ‘2024 वायआर 4’ पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या लघुग्रहाच्या पृथ्वीवर आदळण्याच्या शक्यतेमुळे शास्त्रज्ञांच्या नजरा यावर रोखल्या आहेत. नासा आणि युरोपीयन स्पेस एजन्सी या दोन्ही संस्था या लघुग्रहाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

‘2024 वायआर 4’ नावाचा हा लघुग्रह मध्यम आकाराच्या इमारतीएवढा मोठा आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला, तर 50 किलोमीटरच्या परिसरात मोठा विनाश होऊ शकतो. त्याची गती ताशी 38,028 किलोमीटरपर्यंत असू शकते, ज्यामुळे होणारे नुकसान गंभीर असेल.

सध्या हा लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे 4.5 कोटी किलोमीटर दूर आहे. त्याला पृथ्वीपर्यंत पोहोचायला आठ वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. शास्त्रज्ञांनी या लघुग्रहाच्या संभाव्य धोक्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.

हा लघुग्रह 22 डिसेंबर 2032 रोजी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 1.2 टक्के असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजेच, 98.8 टक्के शक्यता आहे की तो पृथ्वीच्या जवळून सुरक्षितपणे निघून जाईल. मात्र, शास्त्रज्ञ कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे ते या लघुग्रहाच्या मार्गावर सतत लक्ष ठेवून आहेत.

या लघुग्रहाचा शोध 27 डिसेंबर रोजी चिलीमध्ये बसवलेल्या ‘ऑटलास’ दुर्बिणीने लावला. ही दुर्बिण नासाच्या मदतीने स्थापित करण्यात आली आहे. आता या दुर्बिणीसोबतच न्यू मेक्सिकोतील मॅग्डेलेनिया रिज ऑब्झर्व्हेटरी आणि चिलीतील डॅनिश टेलिस्कोपच्या माध्यमातूनही या लघुग्रहावर नजर ठेवली जाणार आहे.

शास्त्रज्ञांनी या लघुग्रहाच्या पृथ्वीवरील संभाव्य धोक्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. या अभ्यासातून पृथ्वीला भविष्यात अशा धोक्यांपासून वाचवण्यासाठी मदत मिळू शकते.

Leave a Comment